कापूस

कपाशीच्या पानांवरील अल्टरनेरिया ठिपके

Alternaria macrospora

बुरशी

थोडक्यात

  • पानावर जांभळ्या कडांसकट तपकिरी ते राखाडी ठिपके येतात.
  • ठिपके हळुहळु वाळतात.
  • केंद्र बहुधा गळतात.
  • फांद्यांवर छोटे दबलेले डाग येतात.
  • कळ्या गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

लवकर संक्रमण झाले असता पान आणि पर्णकोषांवर बारीक, गोलाकार, तपकिरी ते गव्हाळ रंगाचे, जांभळी कडा असलेले ठिपके उमटतात जे १-१० मि.मी व्यासाचे असतात. या ठिपक्यांची अनेकदा केंद्रीत वर्तुळाकार वाढ झालेली दिसते जे वरच्या पृष्ठभागावर एखाद्या भागातअधिक स्पष्टपणे होते. जसे डाग वाढतात, त्यांची केंद्रे हळुहळु वाळतात आणि राखाडीसर होतात, क्वचित भेगाही पडतात आणि (बंदुकीने गोळी मारल्यासारखे दिसते) गळतात. हे डाग मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि पानाच्या पात्याच्या मध्यभागी अनियमित आकाराचे वाळलेले भाग तयार होतात. आर्द्र हवामानात बुरशी मोठ्या प्रमाणात बीजाणू तयार करते आणि सोडते, ज्यामुळे हे ठिपके काजळी काळे दिसतात. फांद्यावर व्रणांची सुरवात बारीक खोलगट ठिपक्यांनी होते जे नंतर कँकर्समध्ये (व्रणांमध्ये) विकसित होतात, भागांना भेगा आणि तडे जातात. गंभीर संक्रमण झाले असता फुलांच्या कळ्या गळतात, ज्यामुळे बोंड विकसित होत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सुडोमोनस फ्ल्युरोसेन्सची (१० ग्रॅम प्रति किलो बियाणे) बीज प्रक्रिया पिकांना थोडेफार संरक्षण देते आणि ०.२% प्रत्येक १० दिवसांनी फवारणी केल्यास संक्रमण खूप कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सामान्यत: ठराविक बुरशीनाशकाचा वापर करण्याइतके हा रोग पिकाचे नुकसान करीत नाही. गंभीर प्रकरणात, मॅनेब, मँकोझेब (२.५ ग्रॅम/ली), हेक्झाकोनाझोल (१ मि.ली/ली), टेब्युकोनाझोल आणि डायफेनोकोनाझोलसारखी बुरशीनाशके वापरुन अल्टरनेरिया पानावरील ठिपक्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. स्ट्रोबिल्युरिन्स (उदा. ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन) किंवा स्टेरोल बायोसिंथेसिस इनहिबीटर्स (उदा. ट्रियाडीमेनोल, ईपकोनाझोल) ची बीज प्रक्रिया करून बियाणांत जंतुविरुद्ध प्रतिकार निर्माण केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

अल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी इतर कोणतेही जिवंत यजमान उपलब्ध नसल्यास कपाशीच्या अवशेषात जगते. जंतुंचा प्रसार वार्‍याबरोबर वाहणार्‍या बीजाणुंद्वारे आणि उडणार्‍या पाण्यामुळे निरोगी झाडावर होतो. ओले वातावरण आणि २७ अंश तापमानात संक्रमण जोर पकडते. रोपावस्थेत आणि हंगामात उशीरा पाने गळण्याचा काळ या रोगास जास्त संवेदनशील असतो. संक्रमणाची जोखीम कपाशीच्या पानांवर खालपासुन वरपर्यंत कमी होत जाते. बुरशीला अनुकूल परिस्थितीत खासकरुन जर फळ फांद्या बुरशीने संक्रमित झाल्या तर कपाशीच्या संवेदनशील वाणांच्या पानांची मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. झाडांना जास्त फळधारणा किंवा अकाली पानगळ झाल्याने येणार्‍या भौतिक किंवा पोषणांच्या ताणाने या रोगाच्या लक्षणांचा विकास जास्त होतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण निवडा.
  • हवा चांगली खेळती ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी नियमितपणे निरीक्षण करा.
  • झाडाचे अवशेष काढा आणि शेतापासुन दूर नेऊन जाळा.
  • झाडाचा ताण विशेषतः पालाशाची कमतरता टाळा.
  • गंभीर संक्रमण झालेल्या कपाशीच्या झाडांना काढून नष्ट करा.
  • शेतातील उंच गवत आणि तण काढून टाका.
  • शरद ऋतुत मशागत केल्यास संक्रमित झाडांचे अवशेष काढण्यास मदत होते.
  • तृणधान्यासारख्या यजमान नसणाऱ्या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा